मुंबई – मुंबईतील पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी म्हणजेच त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आता मुंबईतील विविध सदनिका,बंगले आणि प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. मुंबईकर नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
महापालिकेने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लिमिटेड या सेवाभावी संस्थेच्या वतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे शहरातील विविध सदनिका, बंगले, सोसायटीमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी गट प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पांतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी नुकतेच निरंतर अभियान हाती घेतले आहे. त्यानंतर आता पाळीव प्राण्यांचीदेखील नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाळीव प्राण्यांच्या निरोगी आयुष्यासाठी तसेच रेबीज आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईकरांनी महापालिकेला सहकार्य करावे. त्यासाठी https://www.pets-survey.org/bm या लिंकवर आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.