नागपूर – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कोठडीत बंद असताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याचे लगेच लक्ष गेल्यामुळे दुर्घटना टळली. शेख तौसीफ शेख फैजान (२३) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
तौसीफ सोमवारी रात्री साडेआठ वाजतापासून ब्लँकेटची दोरी तयार करीत होता. रात्री नऊ वाजता त्याने पोलीस ठाण्याच्या कोठडीच्या लोखंडी सळाखीला दोर बांधून गळफास घेतला. काही वेळाने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे लक्ष कोठडीकडे गेल्यामुळे प्रकार लक्षात आला. पोलिसांनी धावपळ करीत कोठडीचे कुलूप उघडले आणि त्याचा गळफास सोडविला.
तौसीफ कोठडीतच बेशुद्ध पडल्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी आरोपी तौसीफवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचा हलगर्जीपणा एका आरोपीच्या जीवावर बेतला असता. गेल्या काही दिवसांपासून हुडकेश्वर पोलिसांचा कारभार वादग्रस्त ठरत आहे.