कीव्ह – रशिया व युक्रेनमध्ये गेल्या १९ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनने या युद्धासाठी आत्मघाती अंडर वॉटर ड्रोन ‘मारीचिका’ तयार केला आहे. हा ड्रोन समुद्रात शत्रूची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यासाठी तयार केला आहे. युक्रेन सतत मानवरहित शस्त्रास्त्रे तयार करत आहे.
‘मारीचिका’ या ड्रोनला चाचणीसाठी नेले जात असल्याचा व्हिडिओ युक्रेनने प्रसिद्ध केला आहे. या ड्रोनमुळे रशियाच्या नौदलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. युक्रेन सरकारशी संबंधित स्टार्टअप ‘अम्मो युक्रेन’च्या अभियंत्यांनी हा ड्रोन तयार केला. हा ड्रोन सहा मीटर लांब असून त्याचा पल्ला ६०० मैल आहे. हा ड्रोन क्रिमीया व रशियाला जोडणारा महत्वाचा पूल उद्ध्वस्त करू शकतो.
ब्रिटनच्या एका वृत्तसंस्थेने अहवालात सांगितले की, ‘मारिचिका’ ड्रोनची किंमत ३.५३ कोटी रुपये आहे. एका अज्ञात स्थळी या ड्रोनचे परीक्षण केले जात आहे. हा ड्रोन नेमका कधी सक्रिय सेवेत येणार याची घोषणा केलेली नाही. मात्र, युक्रेनला या युद्धात रशियावर आघाडी मिळवायची आहे. त्यामुळे लवकरच हे ‘ड्रोन’ समुद्रात उतरवणार आहे. युक्रेन युद्धाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार मारिया एवडिवा म्हणाल्या की, रशियन जहाजांना उद्ध्वस्त करताना ‘मारिचिका’ लवकरच दिसून येईल. या युद्धात सरकार, खासगी क्षेत्र व आंतरराष्ट्रीय समर्थनामुळे युक्रेनच्या ड्रोन उद्योगात मोठे परिवर्तन आले आहे. युक्रेनमध्ये आता हवा, जमीन व पाण्यात आक्रमण करण्यासाठी नवनवीन ड्रोन विकसित केले जात आहेत.