तेहरान- दक्षिण इराणमधील अनेक शहरांमध्ये तापमानात वाढ झाली असून, तापमान ४५अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे इराणमध्ये दोन दिवसांची सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक व वृद्ध आणि गंभीर आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना घरातच राहण्याचे आवाहन इराण सरकारकडून करण्यात आले आहे. आरोग्य मंत्री बहराम एनोल्लाही यांनी देखील बुधवार आणि गुरुवारी देशात तापमानात वाढ होणार असल्याने दोन दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला सादर केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.
सरकारचे प्रवक्ते अली बहादोरी जहरोमी यांनी ट्विट करत दक्षिण इराणमधील अनेक शहरांमध्ये उष्णतेचे प्रमाण ४५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्याने देशभरातील सार्वजनिक आणि खाजगी संस्थांही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. अत्यावश्यक सेवा प्रदान करणाऱ्या संस्था कार्यरत राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इराण हवामान संस्थेच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस बहुतेक प्रांतांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ किंवा त्यापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. अहवाझ सारख्या काही शहरांमध्ये तापमान ५० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. शेजारच्या इराकमध्ये प्रशासनाने उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ४ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. यासोबतच लोकांना उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.