कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले आहे. अचानक उद्भवलेल्या या महामारीमुळे मोठ्याप्रमाणात दुःखाचे डोंगर कोसळले. त्यातूनच अनेकांची आर्थिक कोंडीही झाली. अनेकांच्या घरातील कमावती व्यक्ती गेल्याने उदरनिर्वाहाचा खर्चाचा ताण तर आलाच शिवाय कर्जाचे हफ्ते फेडणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास काय करावे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. कर्जाचे हफ्ते वेळेत न भरल्यास बँक घरावर जप्ती आणले का किंवा घराचा लिलाव करेल का, यासाठी काय करावं लागेल यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
सर्वात आधी गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीचे निधन झाल्याची माहिती बँकेला तत्काळ कळवा. जेणेकरून कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी कायदेशीर वारस, सह अर्जदार किंवा जामीनदाराकडे जाईल. यामुळे कर्जाची पुनर्रचना केली जाते. यातून कर्ज परतफेड करण्यासाठी योग्य वारसदार कोण असेल याची चौकशी केली जाते.
गृहकर्ज फेडणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्यास बँकेकडून तुम्ही काही दिवस मुदत मागू शकता. या मुदतीत तुम्हाला पुढील काही महिने स्थगिती मिळू शकते. किंवा अशा प्रकरणात बँक तुम्हाला हप्त्याची रक्कम कमी करून कालावधी वाढवून देऊ शकते. दरम्यान, कर्ज भरणे हे अत्यावश्यकच आहे. कारण कर्ज न फेडल्यास वारसदारांना मालमत्तेवर हक्क सांगता येणार नाही किंवा मालमत्ता नावावर करता येणार नाही.
कधी होते कारवाई
हप्ता भरण्यास 90 दिवस उशीर झाल्यास बँक कारवाई करू शकते. या 90 दिवसांत बँका कायदेशीर वारसांना किंवा सह कर्जदारांना मालमत्तेचा ताबा घेण्यास पुरेसा वेळ देतात. 90 दिवसांपर्यंत हप्ता न भरल्यास त्या मालमत्तेला नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) म्हणून घोषित केले जाते.
मालमत्ता नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) म्हणून घोषित केल्यानंतर बँकेकडून मालमत्तेच्या कायदेशीर वारसाला नोटीस पाठवते आणि 60 दिवसांच्या आत कर्जाची परतफेड करण्यास सांगते. नोटीस प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत उत्तर न मिळाल्यास बँक मालमत्तेचा लिलाव करू शकते.