संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या
निवडणुकीसाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बारामती – नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यांतील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहीर केली जाणार असून 4 ऑगस्टपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.जेथे आवश्यकता भासेल त्या ठिकाणी 18 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. लगेच दुसर्‍या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत. यंदा अर्ज माघारी घेणे व प्रत्यक्ष मतदान यात 14 दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला असल्याने ती एक नवीन बाब ठरणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार याद्यांची निश्चिती झालेली असून त्या मतदार याद्यानुसारच आता मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. दरम्यान सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष जनतेतून निवडावा अशी भाजपची भूमिका असल्याने राज्य शासन त्या बाबत काय निर्णय घेणार या बाबतही उत्सुकता आहे. मात्र आता निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहिर केल्याने नगरपालिकांच्या निवडणकांचा बिगुल वाजला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami