नवी दिल्ली- सलग तीनवेळा लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या 71 खासदारांची संपत्ती सरासरी 286 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. 2009 मध्ये 71 खासदारांची सरासरी संपत्ती 6.15 कोटी होती, जी 2014 मध्ये वाढून 16.23 कोटी झाली. येत्या 5 वर्षांत म्हणजे 2019 मध्ये ही 17.59 कोटी रुपये वाढून 23.75 कोटी झाली. यात महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 89 कोटी, रावसाहेब दानवेंच्या संपत्तीत 20 कोटी, भावना गवळींच्या संपत्तीत 6 कोटी आणि प्रतापराव जाधवांच्या संपत्तीत 10 कोटींची वाढ झाली.
असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स(एडीआर)या संस्थेने खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावर तयार केलेल्या अहवालात ही बाब उजेडात आली आहे. यामध्ये भाजपच्या 43, काँग्रेसच्या 10, तृणमूल काँग्रेसच्या 7, बीजद आण शिवसेनेचे 2-2 खासदार आहेत. जेडीयू, एआयएमआयएम, एआयईयूडीएफ, आययूएमएल, राष्ट्रवादी, शिरोमणी अकाली दल आणि नॅशनल कॉन्फरन्सचे एक-एक खासदार आहेत. शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल अग्रस्थानी आहेत. त्यांची संपत्ती सर्वाधिक 157.68 कोटी रुपये इतकी वाढ झाली. 2009 मध्ये हरसिमरत कौर यांची संपत्ती 60.31 कोटी रुपये इतकी होती. ती 2019 मध्ये ती 217.99 कोटी रुपये इतकी झाली.
सुप्रिया सुळेंची संपत्ती 2009 मध्ये 51.53 कोटी रुपये इतकी होती. 2019 मध्ये ही संपत्ती 140.88 कोटी इतकी झाली. 2009 ते 2019 मध्ये सुप्रिया सुळेंच्या संपत्तीमध्ये 89.35 कोटी रुपये इतकी वाढ झाली. भाजपचे खासदार पीसी मोहनांनी 2009 मध्ये बंगळूर येथून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांची संपत्ती 5 कोटी इतकी होती. 2019 मध्ये ती 75 कोटी झाली आहे. पीलीभीतचे भाजपचे खासदार वरुण गांधींची 2009 मध्ये संपत्ती 4.92 कोटी रुपये इतकी होती. 2019 मध्ये ती 60.32 इतकी झाली आहे. तर वरुण गांधी यांच्या आई आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची 2009 मध्ये संपत्ती 17 कोटी होती ती 2009 मध्ये 55 कोटी इतकी झाली आहे.