L&T chairman SN Subrahmanyan : एल अँड टी चे (Larsen & Toubro) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रह्मण्यन हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी भारतातील बांधकाम मजुरांच्या स्थलांतराबाबत वक्तव्य केले आहे. चेन्नईमधील CII मिस्टिक साउथ ग्लोबल लिंकेजेस समिट 2025 दरम्यान बोलताना त्यांनी कामगार स्थलांतराबाबत मत व्यक्त केली. कल्याणकारी योजनांमुळे अनेक कामगार नोकरीसाठी स्थलांतरित होण्यास किंवा काम करण्यास इच्छुक नसल्याचे मत त्यांनी वक्तव्य केले.
कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवे. घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार आहात, अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे वादाला सुरुवात झाली होती. आता पुन्हा एकदा ते नवीन वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
“एक संस्था म्हणून आमच्याकडे 2.5 लाख कर्मचारी आणि 4 लाख कामगार आहेत. कर्मचार्यांच्या वाढत्या राजीनाम्याची चिंता मला आहेच, पण सध्याच्या परिस्थितीत मजुरांची उपलब्धता ही माझ्यासाठी अधिक चिंतेची बाब आहे,” असे सुब्रह्मण्यन म्हणाले.
“मजूर संधी अससताना स्थलांतर करण्यास तयार नाहीत. कदाचित त्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली आहे, कदाचित त्यांना मिळणाऱ्या विविध सरकारी योजना आणि थेट लाभ हस्तांतरण यामुळे असे होत असेल, पण ते स्थलांतर करण्यास इच्छुक नाहीत,” असेही मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी भारताच्या तुलनेत मध्यपूर्व देश अधिक वेतन देत असल्यामुळे कामगार तिकडे स्थलांतरित होत असल्याचेही मत व्यक्त केले.