Gyanesh Kumar New CEC: केंद्र सरकारने ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून नियुक्ती जाहीर केली. ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत. ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे केरळ केडरमधील IAS अधिकारी आहेत.
आता निवडणूक आयोगामध्ये उत्तराखंड केडरचे अधिकारी सुखबीर सिंह संधू आणि तसेच विवेक जोशी हे इतर दोन निवडणूक आयुक्त आहेत. सरकारने विवेक जोशी यांचीही निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती जाहीर केली.
पंतप्रधान मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधानांकडून नामांकित केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवड समितीने ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यास मंजूरी दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त अधिनियम, 2023 अंतर्गत करण्यात आलेली हा मुख्य निवडणूक आयुक्तांची ही पहिली नियुक्ती आहे.
कोण आहेत ज्ञानेश कुमार?
ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे केरळ केडरमधील अधिकारी आहेत. त्यांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून निवृत्ती घेतली. मे 2022 पासून ते अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत होते.
ज्ञानेश कुमार यांनी गृह मंत्रालयात पाच वर्षे काम केले आहे. त्यांनी मे 2016 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत संयुक्त सचिव आणि सप्टेंबर 2018 ते एप्रिल 2021 या कालावधीत अतिरिक्त सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली.
त्यांनी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, कानपूर येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी-टेक पदवी प्राप्त केली आहे. तसेच, कुमार यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट्समधून बिझनेस फायनान्सचे शिक्षण घेतले आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आले, त्यावेळी अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी जम्मू आणि काश्मीर विभागाचे नेतृत्व केले आहे.