Uber Auto Fare : ओला, उबर सारख्या अॅप आधारित कॅब सर्व्हिसचा वापर प्रचंड वाढला आहे. या कंपन्यांकडून वाहनचालक व प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. यासाठी कंपन्यांकडून वाहनचालकांकडून कमिशन देखील आकारले जाते. मात्र, आता उबरने रिक्षाचालकांकडून कमिशन घेणे बंद केले आहे.
राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म उबरने भारतातील ऑटोरिक्षा चालकांसाठी शून्य-कमिशन मॉडेल अवलंबले आहे. त्याऐवजी त्यांच्याकडून सबस्क्रिप्शन फी आकारली जाईल. स्पर्धा तीव्र असल्याने स्थानिक प्रतिस्पर्ध्यांनी अवलंबलेल्या धोरणाचा उबरकडून स्वीकार केला जात आहे.
उबरने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, आता ग्राहकांना केवळ जवळील ड्रायव्हर्सशी जोडले जाईल. तसेच, भाड्याची रक्कम सुचवली जाईल, , परंतु अंतिम रक्कम चालक आणि प्रवासी हे चर्चा करून ठरवू शकतात.
ओला आणि उबरकडून आकारल्या जाणाऱ्या उच्च कमिशन शुल्कामुळे ड्रायव्हर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये चालकांकडूनही आंदोलन करण्यात आले आहे. रॅपिडो सारख्या कंपनीकडून तीन चाकी रिक्षा चालकांकडून कोणतेही कमिशन आकारले जात नाही. त्याऐवजी त्यांच्याकडून दररोज किंवा साप्ताहिक सबस्क्रिप्शन फी घेतली जाते. आता उबरकडूनही हाच निर्णय घेण्यात आला आहे.