इस्त्रोची शतकीय कामगिरी, 100वी अंतराळ मोहीम यशस्वी

ISRO Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO) एक मोठी कामगिरी करत इतिहास रचला आहे. इस्त्रोने 100वी अंतराळ मोहीमेचे यशस्वीरित्या प्रेक्षपण पूर्ण करण्याची कामगिरी केली. अंतराळ संस्थेने 100व्या मोहिमेअंतर्गत नवीन नेव्हिगेशन उपग्रह अंतराळात यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला.हे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले.

इस्त्रोने जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हिकलचे (GSLV-F15) यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. याद्वारे नेव्हिगेशन उपग्रह NVS-02 अंतराळात नेण्यात आला. या उपग्रहामुळे भारतीय नेव्हिगेशन सिस्टम अधिक मजबूत होईल. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पदभार स्विकारणारे इस्रोचे नवे अध्यक्ष वी. नारायणन यांच्या नेतृत्वाखालील हे पहिले प्रक्षेपण होते.

हे प्रक्षेपण भारताच्या NavIC (नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन) प्रणालीचा एक भाग आहे. NavIC ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली असून, यामुळे परिवहन, संरक्षण, सागरी सुरक्षा, कृषी आणि संचार क्षेत्रांमध्ये मोठे क्रांतिकारी बदल घडून येतील. हा उपग्रह इंटरनेट-ऑफ-थिंग्स (IoT) आणि आपत्कालीन सेवांसाठीही महत्त्वाची भूमिका बजावेल.

ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. इस्रोच्या टीमने एकदा पुन्हा भारताला अभिमानित केले आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 100व्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्त्रोचे अभिनंदन केले.