सिंधुदुर्ग- कोकणातील एक अनोखी आणि आगळी वेगळी परंपरा म्हणजे ‘गावपळण’ समजली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर गावात तर सुमारे ६०० वर्षां पासुन ही परंपरा सुरू आहे. रवळनाथाच्या कौलाने दर तीन वर्षांनी मोठ्या उत्साहात चिंदर गावची गावपळण ही परंपरा सुरू होते. चिंदर गावात गावपळणीला दुपारनंतर सुरुवात होते. सध्या गावकरी हे गाव गुराढोरांसह तीन दिवस वेशीबाहेर तळ ठोकून आहे.हे सर्व ग्रामस्थ तीन दिवसांनी देवाचा कौल घेऊन पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होणार आहे.
चिंदर गाव आजच्या विज्ञान युगातही गावपळण परंपरा पाळत गावाबाहेर जाते. कुणी खासगी वाहनांसह एसटी, रिक्षा,टेम्पोचा आधार घेत तर कोणी बैलगाडीतून पारंपरिक पद्धतीने गावाबाहेर जातात.दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमून रवळनाथाला तांदळाचा कौल प्रसाद घेतला जातो. त्यानंतर गावपळणीला सुरुवात होते.’चिंदर गावची गावपळण करण्यास रवळनाथाची परवानगी आसा काय?’, असे सांगणे करून उजवा कौल प्रसाद झाल्यावर बारा पाच मानकरी एकत्र बसून भटजींना विचारुन तारीख ठरवतात.त्यानंतर गावच्या देवाला कौल लावला जातो. देवाने कौल दिला की गावकरी गाव सोडून वेशीबाहेर राहुट्या उभारून राहतात.
६०० वर्षाची ही गावपळण परंपरेनिमित्त देवाच्या कौलाने चिंदर गाव सुट्टीवर गेले आहे. या गावात पाच ते सात हजार लोकसंख्या आहे. सर्व धर्मीय या परंपरेला मानून गावपळण प्रथेमुळे सुट्टीवर आहे. गावकरी मोठ्या उत्साहाने पूर्ण गाव खाली करत रानावनात वेशीवर झोपड्यांमध्ये राहतात. गावपळणीला काहीजण श्रद्धा तर काहीजण अंधश्रद्धा म्हणून पाहतात. मात्र चिंदरवासीय गावपळण म्हणजे गावाच्या ग्रामदेवताने दिलेला एक कौल म्हणून मानतात. या गावपळणीला चाकरमानीसुद्धा विशेष करून हजेरी लावतात. तर काही मुंबईवासीय सुद्धा याचा अनुभव घेण्यासाठी गावाच्या वेशीवर येऊन गावपळणीचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. या गावपळणीच्या निमित्ताने गावातील महिला एकत्रित येत तीन रात्री फुगड्या,संगीत खुर्चीचा
खेळ तर पुरुष मंडळी भजन-कीर्तन असे वेगळे कार्यक्रम घेत मनोरंजन करत रात्रं जागवतात.