नवी दिल्ली :कतारमध्ये खेळल्या जाणार्या फिफा विश्वचषक २०२२ दरम्यान एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. ब्राझीलचा माजी महान फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले कर्करोगाशी झुंज देत आहेत. यावेळी त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची मुलगी नॅसिमेंटोने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
ब्राझीलमध्ये एका प्रसिद्ध वृत्त पत्रात दिलेल्या माहितीतीनुसार, पेले यांना अंगाला सूज आल्याने अल्बर्ट आइनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली आहे. यानंतर पेलेची मुलगी केली नॅसिमेंटो हिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, आज माझ्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल मीडियामध्ये खूप बातम्या येत आहेत. ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले आहेत. मात्र यात काहीही गंभीर नसल्याचे तिने म्हटले आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये पेलेच्या कोलनमधून एक ट्यूमर काढण्यात आला होता. तेव्हापासून ते नियमितपणे रुग्णालयात तपासणी आणि उपचारांसाठी येत असतात. यावेळीही अशीच नियमित तपासणी आहे.सात महिन्यांपूर्वीही पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पेले यांना हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यांच्या केमोथेरपी उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल त्यांच्या वैद्यकीय कर्मचार्यांनी चिंता व्यक्त केली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.