केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : केंद्रीय भांडारात ग्राहकांसाठी २९.५० रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची विक्री सुरु करण्यात आली आहे. नाफेड आणि एनएफसीसी या संस्था ६ फेब्रुवारी २०२३ पासून २९.५० रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची विक्री सुरु करणार आहेत. केंद्रीय अन्न तसेच सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांची दिल्लीत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे.
भारतीय अन्न महामंडळ, केंद्रीय भांडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ या संस्थांच्या प्रतिनिधींसह झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व संस्था भारतीय अन्न महामंडळ डेपोतून तीन लाख टनपर्यंत गव्हाची उचल करतील आणि त्याचे पिठात रुपांतर करून ते पीठ देशातील विविध किरकोळ विक्रीची दुकाने, फिरत्या विक्री वाहनांच्या माध्यमातून २९.५० रुपये प्रतिकिलो दराने ग्राहकांना विकणार आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग सचिव संजीव चोप्रा यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने २५ जानेवारी २०२३ अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणाऱ्या वस्तूंच्या किंमतींचा आढावा घेतला. यातून खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या माध्यमातून एफसीआयकडील ३० लाख टन गव्हाचा साठा विक्रीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. एफसीआयच्या प्रक्रियेनुसार, ई- लिलावाच्या माध्यमातून व्यापारी, पीठ गिरण्या इत्यादी ३० लाख टन गहू वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे, या लिलावात बोली लावणाऱ्या प्रत्येक अर्जदाराला प्रती विभाग प्रती लिलाव जास्तीत जास्त ३,००० टन गव्हासाठी ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल, लिलाव न करता, राज्य सरकारांना १०,००० टन गहू प्रती राज्य या प्रमाणात २ लाख टन गव्हाचे वितरण करण्यात येणार आहे.