नाशिक – चार वर्षानंतर म्हणजे २०२७ मध्ये कुंभमेळा भरणार आहे. मात्र कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. साधूग्रामसाठी ३५४ एकर जागा संपादित करण्याचा प्राथमिक अंदाज त्याअनुषंगाने महापालिकेने वर्तविला असून त्यासाठी ४१२७ कोटी रुपये लागणार असल्यास अंदाज आहे. त्याअनुषंगाने केंद्र व राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्याची तयारी करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये सिंहस्थासाठी लाखो साधू व भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. कुंभ मेळाव्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळतो. निधी मिळवण्यासाठी महापालिकेला प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो. त्याचबरोबर सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न भूसंपादनाचा असतो. यापूर्वी महापालिकेने साधूग्रामसाठी ७० एकर जागा अधिग्रहीत केली आहे. त्या व्यतिरिक्त २०२६-२७ मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ७० एकर जागा वगळता ३५४ एकर जागा संपादित करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ४१२७ कोटी रुपये लागणार असल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सिंहस्थासाठी भूसंपादन करताना जागा मालकांना चार ते पाच टीडीआर देण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाची भूसंपादनासाठी निधी देण्याची तयारी नसल्याने जागा मालकांना टीडीआर बदल्यात जागा द्यावी लागणार आहे.