मुंबई – मुंबईतील विविध न्यायालयांमध्ये अनेक वर्षे जुनी प्रकरणे पडून आहेत. अशाच तब्बल ११ वर्षांपूर्वी घडलेल्या मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट खटल्याचे कामकाज अखेर गुरुवारपासून सुरू झाले. या खटल्यातील पहिली साक्ष काल विशेष न्यायालयासमोर नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात या बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीने हा खटला लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी तुरुंगातूनच बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे.
मुंबईमध्ये १३ जुलै २०११ रोजी ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार,दादर येथील बस स्टॉपवर बॉम्बस्फोट झाले होते. त्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता तर १३० जण जखमी झाले होते. जानेवारी २०१२ मध्ये एटीएसने नकी अहमद, नदीम अख्तर, कंवरनैन पाथरेजा, हारुन रशीद नाईक या चार जणांना अटक केली होती. तसेच फरारी आरोपी यासीन भटकळ हा या तिहेरी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने दिल्लीहून मुंबईला नकी अहमदकडे स्फोटके पाठवल्याचा आरोप आहे. या खटल्यात एकूण १० आरोपी असून एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी यासीन भटकळ हा ‘इंडियन मुजाहिदीन ‘ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. या खटल्यातील स्वतंत्र साक्षीदाराची साक्ष आता नोंदविण्यात आली. नूर रुग्णालयाजवळ झालेल्या स्फोटातील पुरावे त्याने पोलिसांना दिले होते. विशेष म्हणजे यातील एक आरोपी नकी अहमद शेख याने खटला लवकर सुरू करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता.
दरम्यान, या खटल्यातील आरोपींवर २०१९ मध्ये आरोप ठेवले.त्यानंतर पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याचे आरोप निश्चित केले,खटला सुरू होण्यासाठी पुढील चार वर्षे गेली.इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्यासाठी विलंब झाल्याने खटला रखडला गेला.कारण यातील काही आरोपी इतर राज्यातील विविध तुरुंगात अन्य गुन्ह्यासाठी कैद होते. त्यामुळे त्यांना या बॉम्बस्फोट खटल्यासाठी प्रत्यक्ष न्यायालयात उभे करणे गरजेचे होते.त्यासाठी संबधित न्यायालयाची परवानगी घेणे गरजेचे होते.