नवी मुंबई- औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी आज पत्रकार परिषदेत आपला संताप व्यक्त केला. त्यावेळी ओवैसी म्हणाले की, सरकार फक्त ठिकाणे, उद्याने आणि शहरांची नावे बदलत आहे. इतिहास चांगला असू शकतो, वाईट असू शकतो, पण इतिहास हा इतिहास असतो. त्याच्याशी छेडछाड करणे चुकीचे आहे. जगभरातील हेरिटेज वास्तू आपल्या औरंगाबादमध्ये आहेत. या निर्णयाचा प्रत्येक स्तरावर फरक पडेल, सर्व कागदपत्रे बदलावी लागतील.
एमआयएमचे पहिले (दोन दिवसीय )राष्ट्रीय अधिवेशन आज नवी मुंबईच्या महापे येथील हॉटेल रमदामध्ये भरवण्यात आले. उद्या अधिवेशनाचा दुसरा दिवशी मुंबईत पार पडणार आहे. आजच्या अधिवेशनादरम्यान, खासदार ओवैसी आणि औरंगाबादचे खासदार जलील यांनी पत्रकार परिषदेत घेतली. ओवैसी म्हणाले की, आम्ही नामांतराविरुध्द यापूर्वी मोर्चा काढला होता, लोकांनीही विरोध केला होता. आज सरकारकडे आकडे आहेत. त्यामुळे लोकांना विश्वासात न घेता काहीही केले जात आहे. ही हुकूमशाही आहे. आमच्या विभागाचा निर्णय आमचे लोके घेतील. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत. नाव बदलल्याने पाणी मिळणार? रोजगार मिळणार? असा सवाल करतानाच आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्याही वर आहोत, असा मेसेजच केंद्र सरकारने दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबादचे खासदार जलील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, नामांतराला आमचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. आमचा विरोध फक्त नामांतराला आहे. आमचा छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध नाही. भविष्यातही त्यांच्या नावाला विरोध करणार नाही. आम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचाच आदर करतो. मात्र या महापुरुषांचे नाव घेऊन आम्ही कधीही राजकारण केलेले नाही. ते राजकीय स्वार्थासासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करत आलेले आहेत. आम्ही नावाचा विरोध केला, भविष्यातही विरोध करत राहणार. कारण सरकारकडे लोकांना दाखवण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे अशा प्रकारचे मुद्दे ते पुढे आणतात. लोकांना भावनिक मुद्द्यांमध्ये कसे अडकवायचे, हे त्याचेच एक उदाहरण आहे. जी 20 परिषदेच्या बैठकीच्या दिवशी मी जर विरोध केला तर काय करणार? मी जगासमोर तुमचे घाणेरडे राजकारण उघडे करीन. फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांना सांगतो, मी मोठ आंदोलन उभारणार असल्याची भूमिका जलील यांनी मांडली.