शिमला – हिमाचलमधील खराब हवामान आणि पर्वतांवर गेल्या सात दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे लाहौल-स्पीती आणि ले प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग ३ अधिकृतपणे वाहतुकीसाठी बंद केला आहे. लाहौल स्पिती जिल्ह्यातील उंच शिखरांवर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे आता लाहौल-स्पीती प्रशासनाने हा मार्ग दारचा ते सरचूपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आदेश २०२३ च्या उन्हाळ्यापर्यंत लागू राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशच्या पर्वत रांगांमध्ये गेल्या सात दिवसापासून सुरु असलेली बर्फवृष्टी पाहता आता काल रात्रीपासून पुन्हा बर्फवृष्टीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. लाहौल स्पिती, चंबा आणि किन्नौरच्या उंच भागात हिमवर्षाव सुरू आहे. लाहौल स्पितीचे मुख्यालय केलॉंग आणि अटल बोगद्याजवळ एक इंच बर्फ साचला असंल्याने त्याचवेळी, लाहौल स्पितीचे रस्तेही निसरडे झाले आहेत, त्यामुळे प्रवास धोकादायक ठरू शकतो. तर दुसरीकडे, चंबाच्या पांगी, भरमौरमध्येही रात्रीपासून हलफाय प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे राज्यभर थंडीची लाट सुरू आहे. हवामान खात्याने चंबा, कांगडा, लाहौल स्पीती, मंडी, कुल्लू, शिमला, सिरमौर, किन्नौर या उंच शिखरांवर हलक्या हिमवर्षावाचा इशाराही जारी केला आहे.
उंच भागात बर्फवृष्टी आणि सखल भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्याचप्रमाणे कांगडा, मंडी आणि शिमला येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे. हमीरपूरसह पाच जिल्ह्यांत पाऊस पडत असून शिमल्यातही रात्रीपासून वातावरण खराब असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळपासून रिमझिम पाऊसही येथे झाल्यांमुळे येथील वातावरण चांगलेच थंड झाले आहे. त्यात काल रात्रीपासून झालेल्या हिमवृष्टीनंतर बहुतांश शहरांचे तापमान १०अंशांच्या खाली गेले आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात हा बदल झाला असल्याची माहिती हवामान खात्याचे संचालक सुरेंद्र पाल यांनी दिली आहे.