जयपुर- स्वतंत्र सीएलपी बैठक आयोजित केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आलेल्या राजस्थान युनिटच्या तीन नेत्यांना अद्याप पक्षाकडून क्लीन चिट दिली नसल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त सामील होण्यासाठी सवाई माधोपूरला रवाना होण्यापूर्वी वेणुगोपाल यांनी जयपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, पक्षाने आपल्या राजस्थान युनिटच्या तीन नेत्यांना क्लीन चिट दिलेली नाही, ज्यांना २५ सप्टेंबर रोजी समांतर सीएलपी बैठक आयोजित केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त सामील होण्यासाठी सवाई माधोपूरला रवाना होण्यापूर्वी वेणुगोपाल यांनी जयपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले सध्या हे प्रकरण शिस्तपालन समितीकडे सोपविण्यात आले आहे.
याबाबतचे वृत्त असे की,राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेसने २५ सप्टेंबर रोजी जयपूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची सीएलपी बैठक बोलावली होती. दरम्यान, गेहलोत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर सचिन पायलट यांना राजस्थानमध्ये राजकीय उत्तराधिकारी म्हणून आणले जाऊ शकते, अशी अटकळ सुरू होती. यानंतर गेहलोत यांच्याशी निष्ठावान समजल्या जाणाऱ्या काही आमदारांनी राज्यमंत्री शांती धारिवाल यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक घेतली आणि त्यांचे राजीनामे सभापतींकडे सुपूर्द केले. या प्रकरणी काँग्रेस पक्षाने शांती धारीवाल,आमदार धर्मेंद्र राठोड आणि विधानसभेतील पक्षाचे मुख्य व्हीप महेश जोशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याचवेळी अशोक गेहलोत यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना एक प्रकारे क्लीन चिट देण्यात आली असल्याचे बोलले जात होते. मात्र वेणुगोपाल यांनी अद्याप हे प्रकरण शिस्तपालन समितीच्या विचाराधीन आहे. कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही. तिन्ही नेत्यांना आधीच नोटीस देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे.