मुंबई- भारतात परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत असते.हीअमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी विमानतळ व बंदरामार्गे होणारी तस्करी शोधून काढणारे ‘स्निफर’ श्वान अर्थात वासाद्वारे माग काढणारे कुत्रे कार्यरत असतात.आता परदेशातून येणारी टपाल पार्सल तपासण्यासाठी टपाल कार्यालयात सुद्धा असे ‘स्निफर’ श्वान तैनात करण्यात येणार आहेत.
सीमा शुल्क विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच टपाल खात्यातील परदेशांतून येणारी अमली पदार्थांची पार्सल शोधणे सोपे होणार आहे.मुंबईमध्ये परदेशांतून येणारी सर्व पार्सल फोर्टमधील बॅलार्ड इस्टेट येथील मुंबई परदेशी टपाल कार्यालय येथे उतरवले जाते. सहा प्रमुख देशांतून आलेली ही पार्सल नंतर शहरातील टपाल इतर कार्यालयात पाठविली जातात.या पार्सलमार्फत सध्या ‘हायड्रोपोनिक विड’ म्हणजेच पाणी व कार्बनच्या सहाय्याने अफुची शेती व त्यावर प्रक्रिया करून तयार केलेला अमली पदार्थ या अमली पदार्थांची जोरात तस्करी सुरू आहे. परदेशांतून पाठविल्या जाणाऱ्या पुस्तके वा इलेक्ट्रॉनिक वस्तू, ग्लोव्हज आदी वस्तूंमध्ये लपवून अमली पदार्थ पाठविले जातात.बऱ्याच वेळा या पार्सलवरील पत्ता चुकीचा असतो.या पार्सलची तपासणी करण्यासाठी सीमा शुल्क विभागाने स्वतंत्र अधिकारी नेमलेले आहे.