रियाध – सौदी अरबला मुसळधार पावसाने झोडपले. त्यात २ जणांचा मृत्यू झाला असून पावसामुळे शाळांना सुट्टी दिली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत १७९ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती किंगडम्स नॅशनल सेंटर फॉर मेट्रोलॉजीने दिली.
सौदी अरेबियाच्या अनेक भागात गुरुवारी जोरदार पाऊस पडला. सकाळी ८ वाजल्यापासून पावसाचे थैमान सुरू झाले. दुपारी २ वाजेपर्यंत ६ तासांत १७९ मिमी एवढा विक्रमी पाऊस पडला. त्यामुळे तेथे पूर परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसाने २ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यापूर्वी २००९ मध्ये सौदी अरेबियात जोरदार पाऊस पडला होता. गुरुवारच्या पावसामुळे येथील शाळांना सुट्टी जाहीर केली. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन सौदीच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला. सौदी अरेबियाच्या अनेक शहरांमधील रस्ते जलमय झाले होते. अनेक ठिकाणी वाहने बंद पडली होती. वेग मंदावल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आता पूर परिस्थिती काही प्रमाणात कमी होत आहे. त्यासाठी २,५६४ कामगार ९६० यंत्राच्या मदतीने काम करत आहेत. पावसाचा फटका हवाई वाहतुकीलाही बसला आहे. विमानांची उड्डाणे उशिरा होत आहेत.