चिखलदरा – अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मोडणाऱ्या सेमाडोह जंगलात नर आणि मादी अशा दोन बिबट्यांच्या मृत्यूने संपूर्ण मेळघाटसह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, आता या दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले आहे.याप्रकरणी वन अधिकार्यांनी अटक केलेल्या एका शेतकरी आरोपीने या दोन्ही बिबट्यांना विष घालून ठार मारल्याची कबुली दिली आहे.
एकाच परिसरात दोन बिबट्यांचे मृतदेह आढळून आले होते. विशेष म्हणजे त्यांच्या तोंडातून फेस आल्याचे दोघांचेही लक्षण सारखेच होते. त्यामुळे अधिकार्यांना या प्रकरणात संशय आल्याने त्यांनी सखोल तपास केला. त्यावेळी त्यांनी एका राजेश किशोरी तायडे (४०) नावाच्या सेमाडोह गावातील शेतकर्याला अटक केली. कारण मृत बिबट्यांनी तायडे याच्या तीन शेळ्या फस्त केल्या होत्या.आपल्या शेळ्यांना मारल्यामुळे त्यांनी बिबट्याचा बदला घेण्यासाठी दोन्ही मृत बिबट्यांवर उंदीर मारण्याचे विषारी औषध फवारले होते, अशी कबुली दस्तुरखुद्द राजेश तायडे याने आपल्या जबाबात दिली.त्यामुळे वन अधिकार्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.