बनिहल: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा जम्मू-कश्मीरमधील बनिहाल येथे थांबवण्यात आली. भारत जोडो यात्रेला सुरक्षा न मिळाल्याने ही यात्रा कॉंग्रेसच्या वतीने थांबविण्यात आली आहे. जोपर्यंत सुरक्षा मिळणार नाही तोपर्यंत यात्रा पुढे जाणार नाही असा पवित्रा कॉंग्रेसने घेतला आहे.
याआधी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल म्हटले की, भारत जोडो यात्रेत सुरक्षेमध्ये त्रुटी होती. आम्हाला सुरक्षा मिळत नाही. अशा परिस्थितीत आपण राहुल गांधींना असे पुढे जाऊ देऊ शकत नाही. शुक्रवारी राहुल गांधींची पदयात्रा 9 वाजता सुरू झाली होती. हा प्रवास रामबन ते अनंतनाग असा होता. मात्र बनिहाल येथेच यात्रा थांबवण्यात आली आहे. जोपर्यंत सुरक्षा पुरवली जात नाही तोपर्यंत यात्रा पुढे जाणार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यापूर्वी बनिहालमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.
जम्मू सरकारने सुरक्षा न दिल्याने कॉंग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कन्याकुमारीपासून राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रत्येक राज्यात सुरक्षा मिळाली होती. अचानक जम्मूत सुरक्षा नसल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.