नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र सध्या दिल्लीच्या अर्थसंकल्पाच्या तयारीत व्यग्र असल्याचे त्यांनी सीबीआयला कळवले आहे. सीबीआयच्या सर्व प्रश्नची उत्तरे देईन असे सांगत सिसोदिया यांनी सीबीआयकडे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत वेळ मागितला आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी सकाळी ११ वाजता दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र सध्या दिल्लीच्या २०२३-२४ च्या बजेटची तयारी करत आहोत. बजेटच्या कामात विलंब होता कामा नये, त्यामुळे प्रत्येक दिवस महत्त्वाचा असल्याचे सांगत सीबीआयच्या प्रश्नांपासून पळ काढत नसल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पाच्या कामावर परिणाम होऊ नये, एवढेच आपले मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सीबीआयच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईन असे सांगत मी कुठेही पळत नसल्याचे सांगत सिसोदिया यांनी सीबीआयकडे फेब्रुवारीअखेरपर्यंत वेळ मागितला आहे.
दरम्यान,सीबीआयने चौकशीसाठी बोलावले असल्याची सिसोदिया यांनी शनिवारी ट्विट केले होते. ट्विटद्वारे त्यांनी सीबीआय आणि ईडीने आपल्याविरोधात पूर्ण ताकद लावली आहे, घरावर छापे टाकले, बँक लॉकरची झडती घेतली असल्याचे म्हटले आहे. मात्र आतापर्यंत त्यांना काहीही सापडले नाही. तपासात मी नेहमीच सहकार्य केले आहे आणि यापुढेही करत राहीन, असेही त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.