नवी दिल्ली :- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. दिल्लीच्या मद्य धोरण कथित घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना सीबीआयने समन्स बजावले आहे.
मनीष सिसोदिया यांनी म्हटले की, “सीबीआयने आज पुन्हा बोलावले आहे. माझ्याविरोधात सीबीआय, ईडीची संपूर्ण शक्ती वापरली
जात आहे. माझ्या घरावर छापे टाकले, बँक लॉकर्सची झडती घेतली. माझ्याविरुद्ध कुठेही काहीही सापडले नाही. मी दिल्लीतील मुलांसाठी चांगले काम केले आहे. “शिक्षणाची व्यवस्था केली आहे. त्यांना हे काम थांबवायचे आहे. मी तपासात नेहमीच सहकार्य केले आहे आणि करत राहणार आहे”.
या मद्य धोरणामुळे मद्याची सरकारी दुकाने बंद झाली आहेत आणि खासगी परवाने सरकारने जारी केले आहेत. दारू पिण्याचे वयही दिल्ली सरकारने 25 वरून 21 वर आणले आहे.सरकारचा महसूल वाढवणे, मद्य माफियांचा प्रभाव कमी करणे, ग्राहकांची सोय आणि मद्याचा काळा बाजार रोखणे हे मद्य धोरणाचे मुख्य उद्दिष्ट होते. हे धोरण नोव्हेंबर 2021 पासून अंमलात आले होते.