पर्यावरण प्रेमींचा विरोध,तर
वाळू व्यावसायिकांचे दुर्लक्ष
महाड : महाड येथील सावित्री नदीला दरवर्षी पूर येतो. यावर उपाययोजना करण्यासाठी मागील वर्षप्रमाणे यंदाही नदीतील गाळ काढण्याचे काम सुरु होणार आहे. मात्र त्यामुळे नदी पात्रातील १६८ मगरींचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून याला विरोध होत आहे. मात्र वाळू व्यावसायिकांकडून पर्यावरण प्रेमींच्या विरोधाला दुर्लक्षित केले जात असल्याचे समोर आले आहे.
याबाबतचे वृत्त असे की, महाडजवळील सावित्री नदीत मार्श क्रोकोडाइल प्रजातीच्या मगरिंचे प्रमाण वाढत आहे. या मगरी गोड्या आणि कमी क्षार असलेल्या खाऱ्या पाण्यात वास्तव्य करतात. महाड ते केभुर्ली, दासगाव या पट्ट्यात त्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. या नदीपात्रात गाळाच्या प्रवाहामुळे नैसर्गिक बेटे तयार झाली आहेत. या बेटांवर मगरींचा अधिवास आहे. महाडमधील सिस्केप संस्थेकडून दरवर्षी या मगरींची गणना केली जाते. सद्यस्थितीत या नदीमध्ये १६८ मगरी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जर सावित्री नदीपात्रात असणारी बेटे काढलयास मगरींचे अस्तित्व धोक्यात येणार आहेच. शिवाय नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना नैसर्गिक पद्धतीचे खाद्य मिळते. त्यामुळे त्या मनुष्य वस्तीकडे किंवा किनाऱ्याकडे येत नाहीत. नदीपात्रातील गाळाची बेटे काढली गेली तर मगरी प्रजननासाठी मानवी वस्तीजवळील किनाऱ्याकडे येतील व भविष्यात त्यामुळे मानवी वस्तीला धोका निर्माण होऊ शकेल, अशी भीती पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. विशेषतः महाडमधील सावित्री पात्रात असणाऱ्या मगरी शेड्यूल-एक मधील वन्यजीव प्रकारात येतात. ज्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर या मगरीचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही पर्यावरण प्रेमींचे मत आहे. यासाठी ही बेटे काढण्याला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून, याबाबत पर्यावरण प्रेमी व सी स्केप संस्थेचे अध्यक्ष सागर मिस्त्री यांनी आज महाड प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत सावित्री नदीपात्रातील मगरींचे वास्तव्य धोक्यात येणार असल्याचे सांगून बैठकीचे लक्ष वेधले. मात्र, त्यांच्या या निर्णयाला गांभीर्याने न घेता त्यांचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला,असा आरोप पर्यावरण प्रमींकडून केला जात आहे. तर दुसरीकडे दरवर्षी येणारा पूर आणि त्यावरील उपाययोजना लक्षात घेता प्रशासनाने ही बेटे काढून त्यातील वाळू काढण्याचे धोरण अवलंबिले आहे. यंदाही नदीतील गाळ काढण्याचे काम सुरु होणार आहे.