अखेर तीन वर्षे देखभाल करण्याची घेतली हमी
सावंतवाडी- जोपर्यंत अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत नाहीत,तोपर्यंत दांडेली गावातील निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेत अखेर ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले.
त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्याचे कळताच अधिकारी दाखल झाले.त्यावेळी आक्रमक ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.अखेर रस्त्याची तीन वर्षे देखभाल व बाजूपट्टी निर्धोक करून देणार असल्याची हमी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.यावेळी अधिकारी जागेवर हजर राहत नाहीत.अधिकाऱ्यांनी कामावर प्रत्यक्ष लक्ष ठेवल्यास असे प्रकार होणार नसल्याचे सांगत माजी उपसरपंच योगेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
निकृष्ट दर्जाचे काम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताना दांडेली सरपंच पालयेकर,माजी उपसरपंच नाईक, माजी सरपंच संजू पांगम, ग्रामपंचायत सदस्य नीलेश आरोलकर,अमोल आरोसकर तसेच ग्रामस्थ उत्तम मयेकर,राजन मालवणकर, दुर्गेश शेटकर, आबा माणगावकर आदी उपस्थित होते.
दरम्यान,तीन वर्षांत रस्ता खड्डेमय झाल्यास याची जबाबदारी शाखा अभियंता विनय रंगसूर यांची राहील, असे सामाजिक कार्यकर्ते अमोल अरोसकर यांनी सांगितले.तर दांडेली सरपंच दादा पालयेकर,ग्रामस्थ आबा माणगावकर यांनी बाजूपट्टी धोकादायक बनल्याचे निदर्शनास आणून दिले.यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून शाखा अभियंता रंगसूर यांनी बाजूपट्टीचे बांधकाम करत मजबूत करून देण्याचे आश्वासन दिले.तसेच तीन वर्षे रस्ता विनाखड्ड्यांचा राहील,असेही सांगितले.