सावंतवाडी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या दक्षिण कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या तालुक्यातील सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रा उत्सव उद्या बुधवार ९ नोव्हेंबर रोजी मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे.देवस्थान कमिटीकडून या जत्रोत्सवाची युध्दपातळीवर तयारी केली आहे.लोटांगणाची जत्रा म्हणुन हा उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
जिल्ह्यातील पहिली मोठी जत्रा समजल्या जाणार्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठी गजबज दिसू लागली आहे. गेल्यावर्षी जत्रेला परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता.एकूणच त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी योग्य ती खबरदारी देवस्थान कमिटीकडून घेण्यात आली आहे.मंदिर परिसर स्वच्छता तसेच इतर कामे हाती घेण्यात आली आहे.देवीच्या उत्सवाला होणारी भक्ताची गर्दी पाहता व्यवसायिकाडून मंदिर परिसरात दुकान व्यवसाय थाटण्यासाठी मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.
सावंतवाडी पोलिसानी यंदा यात्रेसाठी चोख बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.त्यासंदर्भात पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी ग्रामस्थांची विशेष बैठक घेतली आहे.यावेळी देवस्थान कमिटीचे बाळा गावकर, रमेश गावकर आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव हा सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या उत्सवासाठी दोन्ही गावात एक वेगळेच वातावरण पाहायला मिळते. जत्रोत्सवाला चाकरमानी गावात दाखल होऊ लागले गावात दोन दिवसांपासूनच गावात आनंदमय वातावरण पाहायला मिळत आहे.यात्रा काळात दरवर्षी निरवडे व वेत्ये मार्गे मोठ्या गाड्यांना प्रवेश दिला जातो.त्यादृष्ठीने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी मारण्याचे काम स्थानिक प्रशासनाने हाती घेतले आहे.