नवी दिल्ली – टेनिसमध्ये भारताचे नाव जगभर गाजविणारी प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा हिला यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती या देशाचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. आता सानिया मिर्झा ही असा व्हिसा मिळविणारी भारतातील तिसरी महिला ठरली आहे. सानियाला हा गोल्डन व्हिसा १० वर्षांसाठी देण्यात आला आहे. सानिया ही पुढील आठवड्यात टोकियोतील ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला दुहेरीत अंकिता रैनासोबत प्रतिनिधित्व करणार आहे. सानियाला गोल्डन व्हिसा मिळाल्यामुळे ती त्याठिकाणी आपली टेनिस अकादमी सुरू करणार आहे.
मूळ भारतीय नागरिक असलेल्या सानियाने दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्याबरोबर लग्न केले आहे. या दोघांचे दुबईत घर आहे पण तिथे त्यांना गोल्डन व्हिसा नसल्याने व्यवसाय सुरू करता येत नव्हता. हे दोघेजण दुबईत क्रिकेट अकादमी आणि टेनिस अकादमी सुरू करणार आहेत. यूएईमध्ये गोल्डन व्हिसा हा उद्योजक, गुंतवणूकदार, वैज्ञानिक, विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यवसायासाठी दिला जातो. २०१९च्या नवीन धोरणानुसार असा व्हिसा असलेले परदेशी नागरिक यूएईत पूर्णपणे मालक म्हणून आपला व्यवसाय सुरू करण्यास पात्र असणार आहेत. पाच किंवा दहा वर्षांसाठी हा व्हिसा असून त्याचे त्याचे आपोआप नूतनीकरण केले जाऊ शकते.