संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

सहा जिल्ह्यातील वकील ७ ऑक्टोबरला कोर्टाच्या कामकाजापासून अलिप्त राहणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर खंडपीठासाठी आता निकराची लढाई

कोल्हापूर- गेली ३८ वर्षे मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे या मागणीसाठी लढा देणार्‍या खंडपीठ कृती समितीने आता पुन्हा एकदा निकराची लढाई सुरू करण्याचा निर्धार केला आहे. मुख्य न्यायाधीशांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोल्हापूर खंडपीठाबाबत निर्णय केला जाईल, असे आश्वासन खंडपीठ कृती समितीला दिले होते.मात्र, याबाबत राज्य शासनानेही कोणतीही हालचाल केलेली दिसत नाही.त्यामुळे शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी सहा जिल्ह्यांतील वकील एक दिवस कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार आहेत.तसेच मुख्यमंत्र्यांना केवळ एका ओळीचे निवेदन दिले जाणार आहे.
सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ऑक्टोबरअखेर पुढील निर्णय न झाल्यास वकील परिषद बोलावून बेमुदत काळासाठी कोर्ट कामापासून अलिप्त राहण्याचा इशाराही देण्यात आला.खंडपीठाबाबत सहा जिल्ह्यांतील वकिलांची संयुक्त बैठक जिल्हा न्याय संकुलातील बार असोसिएशनच्या सभागृहात बोलावण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे होते. सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी यावेळी मते मांडली. या बैठकीत तीन ठरावही संमत करण्यात आले.गेली ३८ वर्षे खंडपीठासाठी लढा सुरू आहे.५८ दिवस कामबंद करून २०१४ मध्ये आपण वकिलांची ताकद दाखवली होती; पण त्यावेळी मिळालेल्या आश्वासनानंतर आपण फसलो की काय, अशी भावना सर्वांमध्ये आहे. आता सबुरीने न घेता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उचलणे गरजेचे असल्याचे यावेळी अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले.
आता ‘ माननीय मुख्यमंत्री यांनी १ कोटी ५० लाख जनतेच्या कोल्हापूर सर्किट बेंच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपला बहुमूल्य वेळ काढावा अशा एकाच ओळीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबर पासून आझाद मैदानावर साखळी आंदोलन तसेच ५५ दिवसांपेक्षा अधिक तीव्र लढा आणि लाक्षणिक उपोषण आंदोलन केले जाणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.गिरीश खडके हे होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami