नवी मुंबई – खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा १७वा वर्धापनदिन नुकताच पार पडला. या दिवसाचे औचित्त्य साधत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
निरोगी जीवनासाठी ज्याप्रकारे आहार आणि व्यायाम महत्त्वाचा असतो त्याप्रमाणे नियमित शारीरिक तपासणी देखील महत्त्वाची असते. ह्या उद्देशाने आरोग्य शिबीरासारख्या जनहितार्थ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी युनिटने खारघरच्या ‘एम्आयटीआर्’ ह्या खासगी रुग्णालयाला भेट देऊन तेथील कार्यकारी व्यवस्थापक डाॅ. सुरज गेडम यांच्याशी आरोग्य शिबीरावरील आपले विचार व्यक्त केले.
रुग्णालयाच्या सोयीनुसार १ डाॅक्टर, ३ परिचारिका आणि १ मार्केटिंग प्रमुख यांचा या कार्यक्रमात समावेश होता. सकाळी १०.०० वाजता आरोग्य शिबिराची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. मंजुषा देशमुख यांच्या तपासणी पासुन झाली. या तपासणीत रक्तदाब, मधुमेह, बी.एम.आय., आणि वैद्यकीय सल्ला इ. समाविष्ठ होते.
आरोग्य शिबिरामध्ये करण्यात आलेली प्रत्येक तपासणी विनामूल्य (मोफत) होती. तसेच अतिरिक्त तपासणीसाठी ५०% पर्यंतची सुटदेखील देण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक आणि जवळच्या रहिवाशांनी उत्तम रितीने सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी उपक्रमाचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पोस्टर्सच्या माध्यमातून जनसंपर्क केला. तसेच कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडत त्यांनी डाॅक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने एकुण १३२ जणांचे तपासणी अहवाल सादर केले. शिबिरामध्ये गर्दी होणार नाही याची स्वयंसेवकांनी योग्य रीतीने काळजी घेतली. त्याचबरोबर तपासणी करण्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीस योग्य ते मार्गदर्शन केले.
शिबिराची सांगता करताना उपस्थित डाॅक्टर आणि परिचारिका यांना प्राचार्यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. हा सर्व कार्यक्रम कोविड-१९ च्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून पार पाडण्यात आला. यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा देशमुख आणि एनएसएस विभागीय अधिकारी डॉ. सुनीता पाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.