नाशिक- सूरत- चेन्नई महामार्गासाठी जमीन संपादित करताना समृध्दी महामार्गाच्या पार्श्वभूमीवर पाचपट मोबदला देण्याची मागणी करत प्रकल्प बाधित शेतकर्यांनी आंदोलन केले. हे आंदोलन बी.डी.भालेकर मैदानावर करण्यात आले. शासनाचा निषेध करत मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला.
जमिनी घ्यायच्या असतील तर आम्हाला समृध्दी महामार्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार भावाच्या पाच पटीने मोबदला द्यावा, जिल्ह्यात इतर क्षेत्रात बागायती जमीन द्यावी. तसेच कुटुंबातील एका तरुणाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, रस्ता शेतकर्यांच्या जमिनीतून जात असल्याने कायमस्वरूपी टोल वसुलीच्या उत्पनातून ५ टक्के रक्कम बाधित गावांना द्यावी. जमिनी सातबारा उतार्यावर जिरायती दाखवण्यात आल्या आहेत त्या बागायती दाखवण्यात याव्या अश्या मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. सदर प्रश्न सोडवल्याशिवाय रस्त्याचे कोणतेही काम करू नये अन्यथा शेतकरी रत्यावर उतरुन आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला. केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेअंतर्गत सुरत-चेन्नई हा १,२७० किलोमीटरचा ग्रीनफिल्ड महामार्ग तयार होणार आहे. हा महामार्ग राज्यातील नाशिक, नगर व सोलापूर या जिल्ह्यातून जाणार आहे. तर,या प्रकल्पासाठी सुरगारा, पेठ, दिंडोरी, निफाड, सिन्नर व नाशिक या सहा तालुक्यांतील जमिनी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. भविष्यात या महामार्गामुळे नाशिक ते सूरत प्रवास अवघ्या पावणेदोन तासांचा होणार आहे.