पिंपरी – काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव व पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनी अखेर आज मंगळवारी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी प्रदेश काँग्रेस सचिव पदासह प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
मागील काही वर्षापासून सचिन साठे हे काँग्रेस पक्षात नाराज होते. त्यांनी त्यांच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाचा राजीनामा वरिष्ठांवर नाराज होऊनच दिला होता. त्यांच्या राजीनामामुळे शहराध्यक्ष पद कैलास कदम यांच्याकडे गेले व सचिन साठे यांना काँग्रेस पक्षाने प्रदेश सचिव पदावर विराजमान केले होते. शहराच्या पक्ष बांधणीकडे, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांचे लक्ष देत नाहीत अशा अनेकवेळा तक्रारी करूनही काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तक्रारीची दखल घेत नसल्याने सचिन साठे हे नाराज होते. अखेर त्यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व प्रदेश काँग्रेस सचिव पदाचा राजीनामा दिला आहे.