मुंबई – पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी झाली नाही. ही सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 10 ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांच्या कोठडीत सात दिवसांची म्हणजेच 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आज त्यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर आजही त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे राऊतांना आणखी एक दिवस कोर्टाच्या निर्णयासाठी वाट पाहावी लागणार आहे. आता उद्या सकाळी 11 वाजता राऊत यांच्या जामीन अर्जावर पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे.