सोलापूर :शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही. यामुळे सध्या शेतकऱ्यांना कांदा रडवतोच आहे. पण आता १० पोते कांदे विकूनही फक्त २ रुपयांचा चेक शेतकऱ्याला मिळाला आहे. व्यपाऱ्याने रोख पैसे न देता शेतकऱ्याला २ रुपयाचा चेक दिल्याने संबंधीत व्यपाऱ्याचा परवाना पंधरा दिवसांसाठी रद्द करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश बाजार समितीचे सचिव सी.ए. बिराजदार यांनी नुकताच काढला आहे.
शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी दहा पोती कांदा सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केला होता. त्या मोबदल्यात एक रुपया प्रति किलोप्रमाणे ५१२ रुपये रक्कम झाल. मात्र हमाली, तोलाई इत्यादी सर्व खर्च वजा जाऊन २.४९ चा चेक शेतकऱ्याच्या हातात ठेवण्यात आला. या विक्रीतून फक्त दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले होते. याबाबतची पावती सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाली होती.
दरम्यान दोन रुपयांचे चेक व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिले होते. यासंदर्भात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने २३फेब्रुवारी रोजी सूर्या ट्रेडिंग यांना नोटीस जारी करत खुलासा मागितला होता. मात्र खुलासा समाधानकारक नसल्याने २४ फेब्रुवारीपासून पंधरा दिवसांसाठी संबंधित व्यापाऱ्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.