चाकण – रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकर्यांच्या मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्य सरकार शेतकर्यांसाठी भिकेच्या योजना राबवत असल्याची गंभीर टीका खोत यांनी केली आहे. चाकण येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेत्यानेच घरचा आहेर दिल्याने राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहे.
चाकण येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी शेतकरी मुद्यावरून सरकारवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शेती आणि शेतकरी अडचणीत असताना राज्य सरकार भिकेच्या योजना राबवित आहेत. याचे कारण जनतेने कायमच भीक मागायला पाहिजे, आपला हक्क मागायला नाही पाहिजे हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचा गंभीर आरोप खोत यांनी यावेळी केला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी आता परकीय शत्रू ओळखायला सोपा आहे. मात्र आपल्यातलाच गब्बर सिंग असेल तर तो ओळखू येत नाही.
कारण तो आपल्यातलाच असतो, असे सांगत राजू शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडले.