- १५० रुपये बँक खात्यात जमा होणार
मुंबई : राज्य सरकारने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मराठवाडा-विदर्भातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शिधापत्रिकाधारकांना नाममात्र दराने देण्यात येणारा शिधा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता दरमहा प्रति लाभार्थींना १५० रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा अशा १४ जिल्ह्यांतील दारिद्रयरेषेखालील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा नियमाखाली अल्पदरात गहू, तांदूळ असा शिधा दिला जातो. आता मात्र १५० रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी आता महिन्याला सरकारवर ६० कोटींचा भार पडणार असून, शिधापत्रिकेतील व्यक्तींना आधार क्रमांकनुसार पैसे दिले जाणार आहेत.
राज्य सरकारने जुलै २०१५ मध्ये या १४ जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यात समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांसाठीही दरमहा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ असे पाच किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी राज्य सरकार भारतीय अन्न महामंडळाकडून प्रति किलो २२ रुपये दराने गहू आणि २३ रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करीत होते. मात्र, आता या योजनेसाठी गहू आणि तांदूळ देण्यास महामंडळाने नकार दिला आहे.