वसई:- वालीव पोलिसांनी आरोपी अभिनेता शीझान खानच्या जामीन अर्जावर आपला जबाब नोंदवला असून याचिकेला विरोध केला आहे. पोलिसांच्या जबाबानंतर न्यायालयाने या प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार, २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे
अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी आरोपी शीझान खान गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात आहे. शीझानने वसई न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर २३ फेब्रुवारी रोजी कोर्टात सुनावणी झाली. मात्र यावेळी शीझानला जामीन मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे त्याचे वकील शरद राय यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. वसई पोलिसांनी शीझानवर ५२४ पानी आरोपपत्रही दाखल केले. त्यावेळी कोर्टाने सुनावणीत पोलिसांना शुक्रवारी अंतिम बाजून मांडण्याचे आदेश दिले होते. त्यांची बाजू ऐकल्यानांतर कोर्ट शीझानच्या जामीन अर्जावर सुनावणी कधी घ्यायची हे ठरवणार होते. यावर आज वालीव पोलिसांनी आरोपी शिजान खानच्या जामिन अर्जावर आपला जबाब नोंदवला असून याचिकेला विरोध केला आहे. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार, २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.