संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

शीख समुदायातील आनंद विधी कायदा लागू करण्याची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई :शीख समाजातील आनंद विवाह कायदा १९०९ नुसार नियम निश्चित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त दहा राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे आणि त्याचे नियमही निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये दिल्ली, पंजाब, केरळ, आसाम, राजस्थान इत्यादी राज्यांचा समावेश आहे.
शीख समुदायातील विवाहासंबंधित आनंद विधींसाठी राज्य सरकारने नियमावली निश्चित करण्याची मागणी करत एका शीख दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आनंद विवाह कायदा १९०९ नुसार हे नियम निश्चित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
शीख समाजातील विवाह सोहळ्यात आनंद कारज नावाचा एक विधी असतो. यानुसार त्यांच्या विवाहाची नोंदणी स्वतंत्रपणे केली जाते. मात्र, महाराष्ट्रात अद्याप याची अमंलबजावणी झालेली नाही. ती न झाल्यामुळे नवविवाहित दाम्पत्यांना हिंदू विवाह कायद्यानुसारच नोंदणी करावी लागते, अशी तक्रार याचिकेतून केली आहे. आनंद कारज विधीनुसार विवाह झाल्यावरही त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकते. मात्र, महाराष्ट्रात अद्याप हा कायदा लागू केला न जाणे दुर्दैवी आहे अशी खंत या याचिकेत नमूद केली आहे.
आनंद कायदा हा साल १९०९ मध्ये निर्माण झाला आहे. त्यानंतर साल २०१२ मध्ये यात सुधारणा करण्यात आली आणि देशातील सर्व राज्यांना कायदा लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र महाराष्ट्रात याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. या प्रकरणात याचिकादार पती-पत्नीने मागील वर्षी औरंगाबादमधील भाई दया सिंह गुरुद्वाऱ्यात विवाह केला होता. पण आनंद विवाह कायदा राज्यात लागू नसल्यामुळे त्या कायद्यानुसार नोंदणी करता आली नाही असे त्यांनी याचिकेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार तो लागू करावा अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे.
शीख धर्मात लग्नाला आनंद कारज म्हणतात. देवावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी आनंद कारजचे सर्व दिवस पवित्र मानले जातात. आनंद कारजमध्ये गुरुग्रंथसाहिबसमोर चार फेरे करुनच शिखांचे लग्न पार पाडले जाते. या सर्व कारणांमुळे शीख विवाह हिंदू विवाह कायद्यांतर्गत होणाऱ्या विवाहांपेक्षा वेगळे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami