मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी काल शिवसैनिकांसह विविध स्तरातील व्यक्ती आणि संस्थांनी त्यांना आदरांजली वाहिली.पण लोअर परळ विभागातील बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने शिवसेनाप्रमुखांना मात्र अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.त्यांनी शिवसेना प्रमुखांची वाचनाची आवड लक्षात घेऊन वृत्तपत्रांचे महत्व दर्शवणाऱ्या मुंबई सफारीचे आयोजन केले होते.ओपन डेक असलेल्या बसच्या दोन्ही बाजूला मराठी आणि इंग्रजीत वृत्तपत्रांचे महत्व विषद करणारे फलक लावले होते.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांनी आपल्या हातात आजच्या जीवनात वृत्तपत्रांचे महत्व सांगणारे फलक घेतले होते.
मुंबईतील ज्या विभागातून ही बस जात होती.त्याठिकाणचे नागरिक या बसकडे मोठ्या कुतुहलाने पहात होते.शिवसेनाप्रमुखांना वाचनाची मोठी आवड होती.ते दररोज मराठी आणि इग्रजी भाषेतील डझनभर तरी वृत्तपत्रे वाचत असत. ही वृत्तपत्रे वाचत असताना त्यांना समाजातील लोकांच्या व्यथा,समस्या आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या घटना समजत होत्या. एखादी बातमी त्यांना भावली की ते लगेच फोन लावून त्या अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून द्यायचे.त्यामुळेच जीवन भोसले यांच्या संकल्पनेतून अनोख्या मुंबई सफरीचे आयोजन करण्यात आले होते.या बसमधील मुलांनी आणि नागरिकांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली.तसेच दादर प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.यावेळी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.