संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 26 September 2022

शिंदे सरकारने निधी रोखल्याने एसटी कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत ?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या काळात दीर्घकालीन संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आधीच मोठा आर्थिक फटका बसला आहे,त्यात आता नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारच्या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे. शिंदे फडणवीस सरकारकडून एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटना पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेने आपल्या एकूण ३४ मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्याची नोटीस एसटी महामंडळाला दिली आहे.
याआधी एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता,तेव्हा कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी पुढील चार वर्षे ३६० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन ठाकरे सरकारने दिले होते. मात्र आता शिंदे फडणवीस सरकार येताच या निधीवर निर्बंध आले.या सरकारने ३६० कोटी रुपयांऐवजी १०० कोटींचा निधी दिल्याने एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम देणे अवघड होऊन बसले आहे.त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयामुळे पुढील महिन्यात सणांच्या हंगामात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
दरम्यान, एसटीच्या कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. जवळपास सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. मार्च २०२२मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर संप मिटला. मात्र, आता सरकारच्या निर्णयामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांकडून याचा विचार सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.खरे तर एसटीचे प्रत्येक महिन्याचे उत्पन्न ४५० कोटींच्या आसपास आहे.
तर एसटी यंत्रणा चालवण्यासाठी महिन्याला साधारण ६५० कोटी रुपयांचा खर्च आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३१० कोटी, डिझेलसाठी २५० कोटी आणि इतर गोष्टींसाठी साधारण ९० कोटीचा खर्च येतो. त्यामुळे आता उर्वरित पैशांची व्यवस्था कुठून करायची, हा पेच एसटी महामंडळासमोर उभा राहिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami