अमरावती- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास ४ महिन्यांचा कालावधी उलटला,तरी देखील मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा अजूनही पार पडलेला नाही.पहिल्या टप्प्यात मंत्रीपदापासून वंचित राहिलेले अनेक आमदार मंत्रीमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्याची आतुरतेने वाट पाहत आहे.अशातच अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रीपदावरून एक मोठं विधान करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळात विस्तारावर बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता, ‘मी काय प्रमुख आहे का? शिंदे गट आणि भाजपमध्ये आमचा प्रहार पक्ष लहानसा पक्ष आहे’,असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.
आमदार बच्चू कडू हे आज अमरावती येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.यावेळी पत्रकारांनी बच्चू कडूंना मंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला, यावर ‘मी आता मंत्री होईल नाही तर अडीच वर्षानंतर मंत्रीपद मिळेल, असं उत्तरही बच्चू कडू यांनी दिलं’.बच्चू कडू यांच्या या विधानानंतर ते पुन्हा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चक्क बच्चू कडू यांनी मीडियावरच आगपाखड केली. शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे.चला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दाखवतो, तुम्ही माहिती घेत नाही, संशोधन केलं पाहिजे. किती जणांच्या खात्यात पैसे आले ते तुम्हाला दाखवून देतो, असे बच्चू कडू म्हणाले.