संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

शिंदे गटाचा पक्षासाठी अनोखा उपक्रम फोन करताच मुख्यमंत्र्यांचा आवाज

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन

मुंबई – खरे तर आपला राजकिय पक्ष वाढावा यासाठी प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळी रणनीती आखली जाते. प्रत्येक पक्ष विविध माध्यमातून,वेगवेगळे उपक्रम राबवून पक्षाला बळकट करण्याचे काम असतो.तसाच काहीसा प्रयत्न आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केला जात आहे. शिंदे गटाने आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.शिंदे गटाने आयव्हीआर अर्थात स्वयंचलित कॉलिंग यंत्रणेच्या माध्यमातून सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे.
शिंदे गटात आता थेट मोबाईलद्वारे सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे.सदस्य नोंदणीसाठी स्वयंचलित कॉलिंग यंत्रणेद्वारे हा मेसेज पाठवला जातोय.त्यातील विशिष्ट नंबर डायल करताच शिंदेंचा आवाज येतोय आणि नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे.या फोन कॉलद्वारे एकनाथ शिंदे सर्वांना सदस्य नोंदणीसाठी आवाहन करत आहेत.“जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतोय. हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी मी एक भक्कम पाऊल उचलले आहे.सुजलाम,सुखलाम महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आपणही माझ्यासोबत सामील व्हा. सामील होण्यासाठी क्रमांक १ दाबा”,असे एकनाथ शिंदे बोलत असल्याचे कॉलमध्ये ऐकू येते.उद्धव ठाकरे गटाने मात्र शिंदे यांच्या या मोहिमेपासून आपल्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
या अनोख्या उपक्रमामुळे शिंदे गटाला सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांना कुठेही जाण्याची आवश्यकता नसेल. याशिवाय ते खर्चिक नाही. फक्त कॉल केला की लगेच एकनाथ शिंदे यांचा आवाज ऐकू येईल.त्यानंतर ते मार्गदर्शन करतील तशी सदस्य नोंदणी होईल.मात्र उद्धव ठाकरे गटाकडून या शिंदे गटाच्या प्रयत्नाला चालबाजी ठरवत टीका केली आहे आणि कट्टर शिवसैनिकांना सावधही केले आहे.त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून महाराष्ट्र राज्याचे बेकायदेशीर मुख्यमंत्रीपद बळकावलेले गद्दार एकनाथ शिंदे यांच्या आवाजाचे स्वयंचलित मोबाईल यंत्रणेद्वारे ९११७२५२४८२७५ या नंबरवरून व्हाईस कॉल येत आहेत.कॉल आल्यानंतर १ दाबा असे ते सूचित करत आहेत.एक दाबल्यावर आपोआप शिंदे गटाला समर्थन केले असा त्याचा अर्थ होईल.अशी यंत्रणा भाजपाच्या आयटी विभागाने आणून भाजप जगात एक नंबरचा पक्ष ठरला आहे.तरी राज्यातील शिवसेनेचे तमाम पदाधिकारी, सोशल मीडियातील शिवसैनिक आणि अंगीकृत सर्व शिवसेनेच्या संघटना या सर्वांना कळविण्यात येत आहे की शिंदे गटाच्या अशा कॉल प्रणालीला प्रतिसाद देऊ नका असे आवाहन ठाकरे गटाने केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami