नवी दिल्ली: निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना पक्ष आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले. हा आनंद नागपूरमधील शिंदे गटाचे कार्यकर्ते थेट अयोध्येत जाऊन साजरा करत आहेत. आज, बुधवारी या कार्यकर्त्यांकडून राममंदिरात जाऊन धनुष्यबाणाची पूजा करण्यात आली.
नागपूरचे शिंदे गट अर्थात शिवसेनेचे आमदार किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली हितेश यादव यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे एक पथक नुकतेच अयोध्येत दाखल झाले आहे. आज शिवसेना पक्षाचे चिन्ह,धनुष्यबाण घेऊन हे कार्यकर्ते राम मंदिरात पोहोचले. या धनुष्यबाणाची तेथील गुरुजींच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली असून, त्यानंतर एका धनुष्यबाणाची खास पूजा करण्यात आली. तो घेऊन विदर्भातील हे कार्यकर्ते लवकरच महाराष्ट्रात परततील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा धनुष्यबाण त्यांना भेट म्हणून दिला जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील कार्यकर्ते अयोध्येत शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन गेल्यामुळे एका नवीच चर्चा रंगली आहे. शिवसेना पक्षाचे चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी अयोध्येत नवस बोलला होता, अशी चर्चा सुरु आहे. तोच नवस फेडण्यासाठी हे कार्यकर्ते अयोध्येत भगवा शिवधनुष्य प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आले आहेत, असे म्हटले जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांना घेऊन लवकरच अयोध्येत जाणार असल्याचे म्हटले जात आहे. पुढील आठवड्यात शिंदे टीमचा हा अयोध्या दौरा निश्चित असल्याचे सांगण्यात येते.