मुंबई- पठाण, डंकी आणि जवान, असे शाहरुख खानचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. शाहरुखच्या पठाण चित्रपटाचा ट्रेलर नुकताच त्याच्या वाढदिवसादिवशी प्रदर्शित करण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची घोषणा झाली. शाहरुखच्या लुकची लोकांनी प्रशंसादेखील केली. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवर्यात सापडला आहे. दाक्षिणात्य निर्माते माणिकम नारायण यांनी तामिळनाडू फिल्म प्रॉड्युसर्स काउन्सिलकडे तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटाची मूळ कथा तामिळ चित्रपट ‘पेरारसू’ची असून ती अटली कुमार यांनी चोरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विजयकांत यांचा ‘पेरारसू’ हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेचे हक्क माणिकम नारायण यांच्याकडे आहेत. पण जवान या चित्रपटाची कथा ‘पेरारसू’ सारखीच आहे असे माणिकम नारायण यांचे म्हणणे आहे. ‘पेरारसू’ या चित्रपटात विजयकांतने पेरारसू आणि इलवारसू अशी दुहेरी भूमिका साकारली होती. जवान या चित्रपटातही शाहरुखची दुहेरी भूमिका असल्याची चर्चा आहे. या बाबत जवानचे दिग्दर्शक अटली कुमार यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु तामिळनाडू फिल्म प्रॉड्युसर्स काउन्सिलकडून 7 नोव्हेंबरनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.