*प्राध्यापक नाही,सुविधा नाही
*३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली
नागपूर- केंद्र सरकारने आयुर्वेदाचा प्रसार करण्याची मोहीम देशभरात सुरू केल्याने जगभरातूनच आयुर्वेदिक उपचारांसाठी भारताकडे ओढा वाढू लागला आहे.तरीही शासनाकडूनच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.पुरेसे मनुष्यबळही नाही. प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरलेली नाहीत.यामुळे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे विद्यार्थीवर्ग हतबल झाला आहे.
महाराष्ट्रात नागपूरसह उस्मानाबाद,नांदेड,मुंबई आणि जळगाव येथे शासकीय आयुर्वेद महाविद्यालये आहेत. याशिवाय १६ अनुदानित आणि ६० विनाअनुदानित आयुर्वेद महाविद्यालये आहेत.खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित आयर्वेद महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.मात्र,शासकीय वैद्यकीय आयुर्वेद महाविद्यालयातील त्रुटी दूर करण्यात आली नाही. भारतीय चिकित्सापद्धती राष्ट्रीय आयोगाने वैद्यकीय मूल्यांकन आणि मानाकंन केंद्राच्या २०२० मध्ये करण्यात आलेल्या तपासणीत अनेक त्रुटी पुढे आल्या होत्या. त्या दूर करण्याची सूचना करण्यात आली होती.परंतु,शासनाने याकडे दुर्लक्ष केले.अखेर २०२२-२३ या सत्रात शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील पदवीच्या ५६३ आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २४६ जागांवर प्रवेशावर स्थगिती लावण्यात आली आहे. पुढील वर्षी २०२३-२४ मधील प्रवेशासाठी त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेळीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर पुढील सत्रातही विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मनाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बीएएमएस आणि एमडीच्या प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरला प्रवेश परीक्षा घेण्यात आली. नोव्हेंबरपासून प्रवेश सुरू होणार होती. सध्या हा विषय आयुष चिकित्सा परिषदेकडे असून या वर्षीचे प्रवेश पूर्ण करावे, अशी मागणी ‘निमा’ स्टुडंट फोरमचे माजी अध्यक्ष डॉ. शुभम बोबडे यांनी केली आहे.राज्यातील पाचही शासकीय महाविद्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आयुर्वेदचे शिक्षण घेण्यासाठी खासगी महाविद्यालयात प्रवेश घ्यावे लागणार आहे.नागपूर जिल्ह्यातील आयुर्वेद महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाच्या १२५ जागा तर पदव्युत्तर अभ्यासक्रम ८० जागा आहेत.राज्यातील महाविद्यालयांना त्रुटी दूर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.अपेक्षित प्राध्यापक संख्या नाही.आवश्यक तेवढ्या खाटेची सुविधा नाही. संशोधनसाठी लागणारे पशुसंशोधन गृह नाही.
महाविद्यालयात ५०टक्के पदे रिक्त आहेत अशी कारणे या स्थगितीसाठी देण्यात आली आहेत.