संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

शांतता कायम राहावी; नाशिक शहरात १२ जुलैपर्यंत मनाई आदेश लागू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यापासून राज्याचे राजकारण अक्षरश: ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी राजकीय निदर्शने पाहायला मिळत आहेत. या सर्व परिस्थितीचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर आंदोलनांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी नाशिकमध्ये २८ जून ते १२ जुलैदरम्यान मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील, असा इशारा पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी दिला आहे.

आयुक्तांच्या आदेशानुसार, प्रक्षोभक भाषणे, वर्तणूक, सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करणे, इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाहीत. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बाळगता येणार नाहीत. कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिकात्मक प्रेतांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडाओरड आणि वाद्य वाजविण्यासही बंदी असेल.

सध्या शिवसेनासमर्थक व बंडखोर आमदार समर्थकांकडून राज्यभर शक्तीप्रदर्शन, आंदोलने आणि निदर्शने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी, समाजकंटकांकडून उपद्रव होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरात पंधरा दिवस मनाई आदेश लागू केले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami