माळशिरस – माळशिरस तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वेळापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत तृतीयपंथी माया अडसूळ यांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तृतीयपंथी माया अडसूळ यांनी चक्क स्टँप पेपरवर आपला जाहिरनामा प्रसिध्द केला आहे. त्यांच्या या जाहिरनाम्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
माया अडसूळ या अल्प शिक्षीत असल्या तरी त्यांना गावाच्या विकासाबद्दल ओढ आहे.गावासाठी नवीन काही तरी करून दाखवायचे आहे. याच जिद्दीने त्यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. मतदारांच्या घरोघरो जावून प्रचार करत आहेत. काॅर्नर सभा घेवून गावाचा काय विकास करणार याची त्या माहित देत आहेत. एवढेच नाही तर निवडून आल्यानंतर गावातील लोकांसाठी आपण कोणती विकास कामे करणार यांचा जाहिरनामा १०० रूपयांच्या स्टाॅम्प पेपरवरच लिहून दिल्याचे ते मतदारांना दाखवत आहेत. तृतीयपंथीच्या स्टाॅम्प पेपरवरील या जाहिरनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे.