नागपूर :- गणेशपेठ परिसरातील रॉय उद्योग समूहाच्या रजत संकुल इमारतीत शिवसेना ठाकरे गटाचे कार्यालय होते. या कार्यालयाचे वीजबिल, भाडे थकीत असल्यामुळे कार्यालय आज रिकामे करावे लागले. मात्र पाच वर्षाचे रेंट एग्रीमेंट संपल्याने हे कार्यालय रिकामे करण्यात आल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे.
सतीश हरडे जिल्हा प्रमुख असताना २०१४ मध्ये गणेशपेठ येथे शिवसेना भवनासाठी कार्यालय भाड्याने घेण्यात आले होते. २० हजार रुपये भाडे आणि इलेक्ट्रिक बिल सेनेला भरायचे होते. तीन ते चार वर्षे कार्यालय सुरू होते. महापालिकेच्या निवडणुकीचे एबी फॉर्मचे वाटप याच कार्यालयातून झाले होते.प्रकाश जाधव जिल्हा प्रमुख झाल्यानंतर सात ते आठ महिने कार्यालयातून कामकाज चालत होते. त्यानंतर शिवसेनेची कार्याकारिणी बदलली आणि शिवसेना भवनातही कोणी फिरकेनासे झाले. त्यामुळे भाडे थकले. शेवटी जागा मालक किशोर राय यांनी कार्यालय रिकामे करायला लावले.
प्रसिद्ध उद्योजक किशोर राय यांच्या मालकीच्या रजत संकुल इमारतीत शिवसेनेचे विभागीय कार्यालय होते. संपर्कप्रमुख म्हणून तानाजी सावंत असताना या कार्यालयाचे धडाक्यात उद्घाटन झाले होते. त्यानंतर अनेक संपर्कप्रमुखांनी याच ठिकाणी बैठकांमधून शिवसेनेला मजबुती देण्याचा प्रयत्न केला. असे असताना शिवसेनेच्या ठाकरे गटावर हे कार्यालय बंद करण्याची वेळ आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.