नवी दिल्ली- आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल अशी घोषणा मंगळवारी केली. रेड्डी यांनी दिल्लीत आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत राज्याच्या नव्या राजधानीची घोषणा केली.
2014 मध्ये, जेव्हा तेलंगणा आंध्र प्रदेशातून वेगळे झाले तेव्हा हैदराबादला 10 वर्षांसाठी दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी म्हणून घोषित करण्यात आले. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हैदराबाद तेलंगणाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत आंध्र प्रदेशला 2024 पूर्वी राजधानीची घोषणा करावी लागली. यापूर्वी 23 एप्रिल 2015 रोजी चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी सरकारने अमरावतीला आंध्र प्रदेशची पुढील राजधानी म्हणून घोषित केले. यानंतर 2020 मध्ये जगन सरकारनेच आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्या असल्याचे सांगितले होते. यामध्ये अमरावती, विशाखापट्टणम आणि कर्नूलची नावे समोर आली. मात्र, नंतर वायएसआर काँग्रेस सरकारने हा निर्णय मागे घेत अमरावतीला राजधानी केली.